
माध्यमात वृत्त छापून आलेले चुकीचे
कार्यकारी अभियंता अ.शं. पवार यांच्याकडून खुलासा
कोल्हापूर दि. 13 (जिमाका) : दूधगंगा दगडी धरणातील गळती काढण्यासाठी आज अखेर रुपये १५ कोटी २३ लाख इतका खर्च झालेला आहे. रुपये १०० कोटी खर्च झाला आहे याबाबत माध्यमात वृत्त छापून आले होते. ते वृत्त चुकीचे आहे असे कार्यकारी अभियंता अ.शं. पवार यांनी कळविले आहे. तसेच गळती पुर्णपणे दुरुस्त झाले असल्याचे दूधगंगा कालवे विभागामार्फत जाहीर केलेले नाही त्यामुळे १०० कोटी खर्च केला हे चुकीचे असल्याचे दूधगंगा कालवे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता अ.शं. पवार यांनी कळविले आहे.
निविदा मध्ये दूधगंगा दगडी धरणातील गळतीचे काम करण्यासाठी पात्र व अनुभव हा निकष काम करण्यासाठी शासन निर्णय दि.१८ ऑक्टोंबर २०२३ मध्ये नमूद मार्गदर्शक तत्वांनुसार ठेवण्यात आलेले आहेत. त्यामधे कंत्राटदारास अशा प्रकारचे काम केल्याचा पूर्व अनुभव असणे, आर्थिक क्षमता, वार्षिक उलाढाल, आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ अशा निकषांचा समावेश आहे. हे निकष पूर्ण करित असलेल्या कंत्राटदाराचा आर्थिक देकार तपासला जाणार आहे. त्यामुळे काम अनुभव नसलेल्या कंत्राटदारास दिले जाणार अशा बातमीमध्ये तथ्य नाही.
प्रत्यक्ष काम करत असताना सदर कामाची तपासणी ही गुणनियंत्रण विभाग व केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र (CW &PRS) पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमधील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता विहित निकषांनुसार राखली जाणार आहे.
कामाची निविदा प्रक्रिया ही कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर होत असते. त्यामुळे स्थानिक अधिका-यांना निविदा प्रक्रियेपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे या वक्तव्यामधे तथ्य नाही. निविदा प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने व पारदर्शकतेने पार पडत असून कोणत्याही व्यक्तीस यामधे हस्तक्षेप करता येत नाही. पात्र ठरलेल्या कंत्राटदारापैकी ऑनलाईन पद्धतीने सर्वात कमी देकार असलेल्या कंत्राटदारास काम दिले जाते. सध्या कामाचा तांत्रिक लिफाफा उघडण्याची कंत्राटदारांच्या पात्रतेबाबतची तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली असून अद्याप आर्थिक देकार उघडला नसल्याने कामाचा देकार किती भरला आहे हे ज्ञात झालेले नाही. सर्व निविदा प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात येत असून सक्षम स्तरावरील मान्यतेनंतर निविदा स्वीकृत करून कार्यारंभ आदेश देण्यात येतील व दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल.
दूधगंगा धरणातून वेळोवेळी नदीत पाणी सोडून बंधारे भरून देण्यात येतात. यावर सिंचन व बिगरसिंचन पाणीवापर होतो. गळतीमधून जाणारे पाणी नदीमधे वाहून जात असल्याने या पाण्याचा वापर सिंचन / बिगरसिंचनासाठी होतो,
धरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून मागील दोन वर्षांपासून धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा न करता मर्यादित पाणी साठा करण्यात येत आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. व सध्या धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही श्री. पवार यांनी कळविले आहे.

