श्री क्षेत्र जोतिबा येथील मानाच्या सासनकाठीचे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्याहस्ते पूजन

0
68

  • कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती व्हावी अशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची दख्खनच्या राजाच्या चरणी प्रार्थना

कोल्हापूर, दि.२३: जिल्ह्यातील श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्रीजोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते पाडळी निनाम (ता.सातारा) येथील मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत निवडणूक निरीक्षक रोहित सिंह, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे आदी उपस्थित होते.


राज्यातील प्रसिद्ध यात्रांमध्ये जोतिबा यात्रेची गणना होते. या यात्रेत होणाऱ्या छबिना सोहळ्यात पाडळी येथील सासनकाठीला मानाचे अग्रस्थान असते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहे. “जोतिबाच्या नावानं चांगभल…!” च्या जयघोषात महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत उंच सासनकाठ्या नाचवत सहभागी झाले. या सर्व भाविकांना जिल्हाधिकारी येडगे यांनी जोतिबा यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासन काठ्यांचे पूजन केले.

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेचा मंगळवार हा मुख्य दिवस असून लाखो भाविक दाखल झाले आहेत. एसटी, बैलगाडी, खाजगी वाहनातून तसेच पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत. मंगळवारी जोतिबा मंदिरात पहाटे पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता शासकीय महाभिषेक झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. तर सकाळी १० वाजता धुपारती सोहळा झाला. दुपारी १२ ते १ या कालावधीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला.

कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती व्हावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती व्हावी, संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दख्खनच्या राजाच्या चरणी केली. श्रीजोतिबा देवस्थान हे कोल्हापुरसह संपूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख देवस्थान आहे. लाखो भाविक या यात्रेनिमित्त येत असून सर्वांसाठी प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व भाविक नियमांचे पालन करीत असून त्यांनी चांगल्या प्रकारे यात्रा पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here