प्रतिनिधी वैभव प्रधान
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातर्गत शिक्षणशास्त्र महाविद्यालयांपैकी कै.बी.जी.खराडे महाविद्यालयाने प्रात्यक्षिकांतर्गत निर्माण केलेला हा पहिलाच उपक्रम. निसर्गप्रेमींकडून कौतुक.
“पर्यावरण रक्षण काळाची गरज” असं आज म्हणणं हीच काळाची गरज आहे. हे फक्त म्हणून चालणार नाही तर ते कृतीत आणणं हे देखील महत्त्वाचं आहे. आजची उष्णता पाहता पर्यावरण रक्षण झालेलं आहे की नाही ? का पर्यावरणाचा ऱ्हासच होतोय हे देखील या पृथ्वीवरील माणसाला समजतंय. हीच पर्यावरणात घडणारी आणि माणसाला वेदना पोहोचवणारी अवस्था पाहून कै. बी.जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे डॉ. शिवाजी गावडे यांच्या संकल्पनेतून सीडबॉल मेकिंग या प्रात्यक्षिकाचा जन्म झाला. ही संकल्पना मनात आल्यानंतर प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी व खराडे कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे वर्कशॉप आज सुरू करण्यात आले. या वर्कशॉपमध्ये रिटा, खैर, बांभूळ, पळस, हिरडा, बेहडा, सागवान, शिकेकाई यांसहित 17 प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या बिया एकत्रित करून सुपीक मातीचे 15000 सिडबॉल प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी तयार केले. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे प्रात्यक्षिक अत्यंत महत्त्वाचे असून 17 जून 2024 रोजी या सिडबॉलचे 300 प्राथमिक, माध्यमिक या शाळांमध्ये त्याचे प्लांटेशन होणार आहे. हे करत असताना सर्व छात्राध्यापकांना या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडण्यात आले आणि भविष्यकाळातील पर्यावरणाला समृद्धता आली पाहिजे हाच हेतू या उपक्रमातून साध्य झाला पाहिजे ही आशा छात्राध्यापकांनी निर्माण केली. प्रत्येक शाळेला यातून 50 सिडबॉल अशा 300 शाळांमधून 15000 सीटबॉल देऊन जास्तीत जास्त पश्चिम घाट हिरवागार करण्याचा मानस असल्याचे संकल्पक डॉ. शिवाजी गावडे व डॉ.अंबाजी पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिये दरम्यान सांगितले. हे प्रात्यक्षिक करत असताना प्रथम वर्षाच्या छत्राध्यापकांनी आनंद लुटत या उपक्रमासंबंधी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रात्यक्षिकातून पर्यावरणाचे रक्षणच होईल हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मेघराजदादा खराडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सी.जी खांडके यांच्या. प्रोत्साहन व मार्गदर्शनाने तसेच डॉ.एम.आर पाटील, प्रा.एस.ए, कांबळे, डॉ.आर. एस. अवघडे, प्रा, श्रुती कुंभार व सर्व कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे योगदान लाभल्याचे डॉ.शिवाजी गावडे यांनी सांगितले.