प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा गट महायुतीतून बाहेर पडणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजप आणि शिंदे गटाची रणनीती अजित पवार यांना वेगळे करून आपली ताकद वाढवण्याची आहे, असा कयास बांधला जात आहे.सूत्रांच्या मते, भाजप आणि शिंदे गट यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि काँग्रेसविरोधी धोरण हे अजित पवार गटाला मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लढण्यासाठी दबाव आणला जात आहे. भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत १६० ते १७० जागा लढवण्याची इच्छा आहे, तर शिंदे गटाला १०० जागांची अपेक्षा आहे. दुसरीकडे, अजित पवार गटाला किमान ६० जागांची मागणी आहे. मात्र, त्यांना २०-२५ जागाच मिळतील अशी चर्चा सुरू आहे.अजित पवार गटाने महायुतीतील काही घटकांवर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार अनिल बोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजित पवार गट अस्वस्थ आहे. सुनील तटकरे यांनी या प्रकरणी थेट दिल्ली येथे तक्रार देणार असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे महायुतीतील मतभेद अधिक उघड झाले आहेत.सध्या अजित पवार यांच्या गटाकडे ४० आमदार आहेत. जर त्यांनी महायुती सोडली तर त्यांना स्वतंत्रपणे ६० जागा लढवता येतील, असं मानले जात आहे. हा निर्णय घेतल्यास त्यांचा गटाच्या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकू शकतात. त्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने चक्रव्यूह रचला असल्याचा आरोप होत आहे. याबाबत एका मिडिया चैनलने देखील याबाबतची माहिती दिली आहे.भाजप आणि शिंदे गटाच्या धोरणांवर अजित पवार गटांत अस्वस्थता वाढत आहे. महायुतीत दोन वेगवेगळ्या गटांमधील संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. जर अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या मतदार संघात भाजपचे इच्छुक तयारी करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथीचे संकेत आहेत.