प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 23 : जागतिक ध्यान दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, राष्ट्रीय सेवा योजना व आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रमुख मार्गदर्शक अजय किल्लेदार व अजिंक्य पाटगांवर यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 21 डिसेंबर 2024 हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा यासाठी भारतासह अनेक देशाने अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आम सभेने एक मताने मंजूर केला. आजच्या आधुनिक जगातील बदलांना सामोरे जाताना तसेच मानसिक शांती मिळण्यासाठी ध्यान धारणा आवश्यक आहे, या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मानसिक स्थिरता प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन व ध्यान धारणा घेण्यात आली. 280 प्रशिक्षणार्थी व संस्थेतील कर्मचाऱ्यांनी यावेळी ध्यानधारणा केली. या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस. एस. माने व ए.एस. पोवार गटनिदेशक, एस.आर. तिके, ए.ए. शिंदे, शिल्पनिदेशक एस.एन. कदम, ए.एम. रसाळ तसेच संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांनी ध्यान धारणा शिबीरामध्ये सहभाग नोंदविला, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानी दिली.