
प्रतिनिधी मेघा पाटील
लोकार्पण झालेल्या इमारती सोमवार पासून येणार वापरात, सीपीआरमधील दुरूस्तीच्या कामांबाबतही व्यक्त केले समाधान
दोन्ही ठिकाणी मंजूर असलेली कामे वेळेत पुर्ण करण्याच्या सूचना

कोल्हापूर, दि.२८ : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. शेंडा पार्क येथील २९ एकर परिसरात भव्य आणि सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी लोकर्पण झालेल्या इमारतींचा प्रत्यक्ष वापर सोमवार दि.३० डिसेंबर पासून होणार आहे. यामध्ये १५० क्षमतेचे मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत व ओडोटोरियम तसेच परिक्षा कक्ष या इमारतींचा समावेश आहे अशी माहिती यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दिली. शेंडा पार्कमधील उभारण्यात येत असलेल्या कॅम्पसमध्ये सर्व रस्ते काँक्रीटमध्ये तयार केले जाणार आहेत. सुरू असलेल्या कामांची माहिती कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे यांनी केले.
शेंडा पार्क येथील उर्वरीत कामे यात १२५ निवसी व १२५० क्षमता असलेल्या आंतरवासिता डॉक्टर्स पुरूष वसतीगृह व महिला वसतीगृह, प्रत्येकी १५० क्षमतेचे मुलींचे व मुलांचे वसतीगृह, १५० परिचारिकांचे वसतीगृह व ३०० परिचारीकांचे प्रशिक्षण केंद्र बांधण्याचे १७५ कोटींचे काम येत्या दोन वर्षात पुर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात झाली असल्याचे कार्यकारी अभियंता तोंदले यांनी सांगितले. तसेच त्याच ठिकाणी न्यायवैद्यकशास्त्र इमारतीचे काम व बॅडमिंटन कोर्ट इ.चे कामही सुरू करण्यात आले आहे. शेंडा पार्क येथे येण्यासाठी आवश्यक इतर रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक निधी नगर विकास विभागाकडून घेण्यासाठी प्रस्ताव देण्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी निर्देश दिले.
सीपीआर इमारत ही हेरीटेज आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरूस्तीची गरज होती. सीपीआर मधील एकुण २१ इमारतींचे दुरूस्तीचे काम सुरू असून यातील दोन इमारतींचे काम पुर्ण झाले असून इतर ७ इमारतींमध्ये दुरूस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी रूग्णांच्या सेवेत अडचणी न आणता कामे सुरू असून मार्च २०२५ पर्यंत सर्व दुरूस्तीची कामे पुर्ण केली जाणार आहेत. उर्वरीत काम येत्या दिवाळीपर्यंत पुर्ण होणार आहे. झालेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले. ११०० बेडच्या हॉस्पीटल इमारतीचे काम अद्याप सुरू नाही, याबाबत मंत्रलयात मंगळवारी बैठक घेवून कामाला गती देणार व तेही काम दोन वर्षात पुर्ण करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
बैठकीपुर्वी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेमार्फत विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. यामध्ये पदभरती, पदस्थापनेचे प्रश्न तसेच पदनिर्मिती अशा विविध विषयांचा समावेश होता.
सोमवार दि.३० डिसेंबर रोजी सायंकाळी शेंडा पार्क येथील विविध पुर्ण इमारतींच्या प्रत्यक्ष वापरास होणार सुरूवात
शेंडा पार्क येथे वैद्यकीय महाविद्यालयातील पुर्ण काम झालेल्या व नुकतेच लोकार्पण केलेल्या इमारतींच्या प्रत्यक्ष वापरास सुरूवात सोमवारी दि.२८ डिसेंबर पासून केली जाणार आहे. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत या कामाची सुरूवात केली जाणार आहे. यामध्ये १५० क्षमतेचे मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत व ओडोटोरियम तसेच परिक्षा कक्ष या इमारतींचा समावेश आहे.