प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व मच्छीमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यपालक, मत्स्यसंवर्धक, अनुदानीत, विनाअनुदानीत लाभार्थी, प्रकल्पधारक मत्स्यविक्रेते, मत्स्यखाद्य उत्पादक व संबंधित सर्व भागधारकांसाठी प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृद्धी सहयोजना (PMMKSSY) ही प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत केंद्रीय क्षेत्र सहयोजना असून सन २०२३-२४ ते सन २०२६-२७ या ४ वर्षांकरिता केंद्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील निगडीत लाभार्थ्यांची नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) अंतर्गत नोंदणी करावयाची आहे. त्यासाठी संबंधितांनी नजिकच्या सामाईक सेवा केंद्र (CSC) येथे जावून आपली नोंदणी इनलँड फिशरीजमध्ये करुन घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) श. र. कुदळे यांनी केले आहे.
यासाठी चालू स्थितीत असलेले आधारलिंक बँक खाते तपशील, आधारकार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड इत्यादी बाबींची आवश्यकता राहील. तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत अपघात गटविमा (GAIS), ई श्रम कार्ड, किसान क्रेडीट कार्ड (KCC) या योजनांचा लाभ घेण्याकरिता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) कोल्हापूर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्या समन्वयाने दि. 28 नोव्हेंबर 2024 रोजी कार्यशाळा आयोजित करुन जनजागृती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) कोल्हापूर, शासकीय धान्य गोडावून रोड, रमणमळा, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कुदळे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.