
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 01: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान-2025 दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी दुचाकी रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, इतर विभागाचे अधिकारी, सामाजिक रस्ता सुरक्षा संस्था पदाधिकारी श्री. रेवणकर तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कोल्हापूर मार्फत जिल्ह्यातील जनेतेमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती व प्रबोधन होण्याकरीता या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन खानविलकर पेट्रोल पंप-दसरा चौक, बिंदु चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- मनपा चौक- सीपीआर हॉस्पीटल-व्हिनस कॉर्नर-ताराराणी चौक-प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर पर्यंत निश्चित करण्यात आला होता.
या रॅलीमध्ये सुमारे 100 दुचाकीधारकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून रस्ते सुरक्षा प्रबोधनात्मक कार्य केले.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियान-2025 अंतर्गत दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत पोलीस, आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ता सुरक्षासंबंधी बॅनर तयार करून मुख्य रस्त्यावर महत्वाचे ठिकाणी प्रदर्शित करणे, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी रस्ता सुरक्षाविषयी व्याख्याने आयोजित करणे, रस्त्यावरील परिवहन वाहने, बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रॉली या वाहनांना परावर्तिका लावणे, वाहनचालकांकरीता नेत्र तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीरांचे आयोजन करणे, मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या शिक्षकांसाठी उजळणी कार्यशाळा आयोजित करणे, रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींसंदर्भात विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करणे, विविध प्रसारमाध्यमाव्दारे रस्ता सुरक्षा स्लोगन प्रदर्शित करणे, इत्यादी उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.