
प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर : (वार्ताहर)महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे सन १९७९ पासून मंडळाच्या नोंदीत आस्थापनेतील, समाजामध्ये व आस्थापनेमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या कामगारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. सदर गुणवंत कामगारांची राज्यातील विविध महामंडळे, जिल्हा व स्थानिक तालुका पातळीवरील शासकीय कमिटी तसेच समित्यांवरती नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने लेखी स्वरूपात राज्य सरकारकडे करणेत आलेली आहे.हा पुरस्कार प्राप्त कामगार विविध संस्था तसेच संघटनांच्या मध्यातून तन, मन, धन अर्पून समाजातील सर्व घटकांसाठी अविरतपणे कार्य करीत असतात. शासनाने देखील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, जिल्हाधिका-यांच्या मार्फत त्यांना वयाच्या ७० वर्षापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.गुणवंत कामगारांच्या वैशिष्ट्यपूर्ण तसेच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, राज्यातील विविध महामंडळे, जिल्हा व स्थानिक तालुका पातळीवरील शासकीय कमिटी तसेच समित्यांवर नियुक्ती करावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा लाभ संबंधित महामंडळे, विविध कमिटी / समितीला होऊ शकतो. पर्यायाने राज्य सरकारला देखील होवू शकतो व त्या अनुषंगाने भरीव समाजसेवा होवू शकते.यासाठी गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कामगारांची राज्यातील विविध महामंडळे, जिल्हा व स्थानिक तालुका पातळीवरील विविध कमिटी / समित्यांवर नियुक्ती करण्याबाबतचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री, मुख्य सचिव तसेच प्रधान सचिव यांना मेलद्वारे तसेच टपालद्वारे पाठविले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.