
प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील ६० ते १०० हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज १ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत आयोजित विशेष बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशांमुळे कोल्हापूरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कोल्हापुरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यात येणार आहे. ही जागा निश्चित करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल होत.