
एस पी नाईन पुणे प्रतिनिधी
पुणे : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीईओपी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डीपेक्स-२०२५’ च्या उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केली.
पाटील म्हणाले, ‘डीपेक्स’ प्रदर्शनाची सुरुवात सांगली येथून १९८६ साली झाली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कौशल्याधिष्ठीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन मिळत असून विविध क्षेत्रात या कल्पना मॉडेल स्वरुपात विकसित होत समाजातील गरजा पूर्ण करण्याचे काम होत आहे.
देशात सर्वत्र संशोधनात्मक वातावरण असून नवोन्मेषक ‘स्टार्टअप’ उभारत आहेत. या स्टार्टअपमधून तयार होणाऱ्या नवनवीन संशोधनाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात देशात निर्माण होत असल्याने भारताला संरक्षण सामग्रीच्या निर्यातीची मोठी संधी आहे. डीपेक्स प्रदर्शन उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी डॉ. जी. सतीश रेड्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील भिरुड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनावणे, सृजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ आदी उपस्थित होते.