
एस पी नाईन पुणे प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील इंदिरा शिक्षण समूह आयोजित ‘सुरुवात एका नव्या युगाची’ या सोहळ्यात इंदिरा विद्यापीठाच्या नव्या वेबसाईट, लोगो आणि अप युवर गेम या टॅगलाईनचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शैक्षणिक उत्कृष्ठता , नावीन्य आणि अमर्याद संधीचे केंद्र म्हणून इंदिरा शिक्षण समूहाची मला ओळख आहे. माणसाला माणूस म्हणून परिपूर्ण घडविण्याची क्षमता संस्थेत आहे. शैक्षणिक योगदान वाखाणण्याजोगे आहे म्हणून संस्थेला विद्यापीठाची मान्यता देण्यात आली असल्याचे पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महिलांना पाच तासांची नोकरी करण्यावर भाष्य केले. ते म्हणाले कि, इथून पुढील काळात महिला आणि मुलींचा आहे. घर संसार याचा गाडा रेटत रेटत शिक्षण, स्किल, बुद्धिमतेचा वापर करून त्यांना नोकरी करता यावी म्हणून १२ ते ५ अशी पाच तासांची नोकरी हा माझा प्रकल्प सुरु असल्याचे पाटील म्हणाले. तशी शिफ्ट करण्यासाठी टाटासह अन्य नामांकित कंपन्या काम करत असल्याने लवकर हे स्वप्न पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर, विश्वस्त सरिता वाकलकर, माजी नगरसेवक राहुल कलाटे, बाबा जाधवराव , वसंत म्हस्के, शार्दूल गांगल, साहिल मेहेंदळे, शान मेहेंदळे, शैक्षणिक सल्लागार प्रा. चेतन वाकलकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.