
एसपी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील
रायगड, १२ एप्रिल : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ, सन्मानचिन्ह आणि पुस्तकं देऊन अमित शाहांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, सहकारी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आशिषजी शेलार, अदिती तटकरे, भरतशेठ गोगावले तसेच अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी अमित शाह यांनी भाषण करताना म्हटले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. सुरुवातीलाच मी राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो. मी शिवचरित्र वाचलंय, त्यांनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुनरुद्धार करण्याची प्रेरणाही दिली. देशाला स्वतंत्र करण्याचा विचारही जिजाऊंनी बाल शिवाजींना दिला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होण्याचा विचारही त्यांनीच दिला. म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणाम, असे शाह म्हणाले.
स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाचा पराजय होऊन महाराष्ट्रात त्याची कबर बांधली गेली. भारतातील पुढच्या पिढीला हा इतिहास शिकवला गेला पाहिजे. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेवू नका, त्यातून देश आणि जगाला प्रेरणा घेऊ द्या, अशी विनंती मी महाराष्ट्रातील जनतेला करतो, असेही शाह म्हणाले. मी बाबासाहेब पुरंदरेंचेही स्मरण करतो. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची कल्पना ही आज आम्ही कॅबिनेटची कल्पना हे त्याचंच विस्तृत स्वरुप आहे. न्यायासाठी शिवरायांचे सिद्धांत त्यांनीच प्रस्थापित केले. स्वराज्याची, स्वभाषेला अमर करण्याची लढाई थांबता कामा नये, हे शिवरायांचे अखेरचे शब्द होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही लढाई गौरवाने जगभरात सुरु आहे. भारताला विश्वभरात गौरवमय स्थानी प्रस्थापित करण्याचं काम मोदी करत आहेत. शिवरायांनी सांगितलं की काशी विश्वनाथाचा उद्धार करा, राम मंदिरासह त्याचाही उद्धार मोदींनी केला, अशी माहिती यावेळी शाह यांनी दिली.