
प्रतिनिधी एस पी नाईन मेघा पाटील
रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड येथील समाधी स्मारकाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ रायगडावर जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा एक संस्मरणीय प्रसंग असणार आहे , असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. हा अविस्मरणीय प्रसंग अनुभवण्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले कि, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी आणि समाधी स्थळ जीर्णोद्धार शताब्दी सोहळा केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि छत्रपतींच्या घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत, उद्या, शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी होत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा एक संस्मरणीय प्रसंग असणार आहे.चला,स्वराज्याच्या तीर्थक्षेत्री जाऊया,आराध्य दैवताला वंदन करुया,शिवरायांच्या स्मृती जागवूया,शिवराय मनामनात साठवूया!!!असे म्हणत पाटील यांनी या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.