एस पी नाईन प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर | दि. २९ जुलै २०२५कोल्हापूर महानगरपालिकेत ठराविक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याचा गंभीर आरोप ठेकेदार प्रसाद संजय वराळे यांनी नुकताच केला आहे. या प्रकारामुळे सरकारी निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता असून, या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी उपनेते संजय पवार आणि सह-संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांकडून पैशांची देवाण-घेवाण केली असल्याचा ठोस पुरावा मिळाल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. हा केवळ ठेकेदाराचा गुन्हा नसून, त्याला मदत करणारे अधिकारीही याला तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.या प्रकरणात काही राजकीय मंडळी आणि प्रशासनातील अधिकारी चौकशीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा पोलीस यांच्याकडे न ठेवता **अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे** तपासासाठी सुपूर्द करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.संजय पवार यांनी म्हटले की, “सरकारी पैसा म्हणजे जनतेचा पैसा. या पैशाची लूट करणे म्हणजे जनतेवर अन्याय होणे. म्हणूनच हे प्रकरण दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं, यासाठी पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.”