शेंडा पार्क परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामे गतीने पूर्ण करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

0
7

प्रतिनिधी जानवी घोगळे

  • सीपीआर परिसरातील विकासकामे दर्जेदार करा
  • कामे पूर्ण होईपर्यंत रुग्णांचे स्थलांतर योग्य पद्धतीने करा

कोल्हापूर दि.1 (जिमाका): शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामे तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरण कामांच्या सद्यस्थितीचा आढावा दर महिन्याला घेण्यात येणार असून ही कामे जलदगतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कागल तालुक्यातील सांगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, व आजरा तालुक्यातील उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालय येथील नुतनीकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू असलेल्या बांधकामाच्या सद्यस्थितीतील कामांची तसेच महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या कामाची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली.

बैठकीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील व शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, माजी वैद्यकीय अधीक्षक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उप अभियंता महेश कांजर, कनिष्ठ अभियंता आशिष पाटील, विद्युत विभागाचे उपअभियंता नवनाथ बनसोडे तसेच संबंधित अधिकारी व संबंधित कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआर मधील इमारतींचे नूतनीकरण होण्यासाठी सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांच्या स्थलांतराचे योग्य नियोजन करा. रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था करून घ्या. सीपीआर मध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून लवकरच याबाबत पाठपुरावा ठेवा.सीपीआर मधील इमारतींची कामे, परिसरातील रस्ते, बांधिव गटर व फूटपाथ तसेच या परिसरातील सर्व कामे दर्जेदार होतील याकडेही लक्ष द्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

रुग्णांची गैरसोय न होवू देता त्यांचे पर्यायी जागेत स्थलांतर करुन सीपीआर परिसरातील इमारतींचा ताबा देण्यात येत असल्याचे असे अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here