
प्रतिनिधी जानवी घोगळे
जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील 4 हजार 265 बालकांना मोहिमेद्वारे लसीकरण
कोल्हापूर, दि.09 : जिल्ह्यात अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व आश्रम शाळांमधील बालकांकरीता गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पाच ते पंधरा वयोगटातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व बालकांना 100 टक्के गोवर व रूबेला लस देण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात लसीकरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस. यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, समाज कल्याण, शिक्षण, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला व बालविकास विभाग तसेच जिल्ह्यातील मदरसा, आश्रमशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नुकत्याच आढळून आलेल्या राज्यातील काही जिल्ह्यांमधील आश्रम शाळांमध्ये गोवर उद्रेक दिसून आला. या अनुषंगाने राज्यातील सर्व अनुदानित तसेच विनाअनुदानित आश्रम शाळांमध्ये गोवर व रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील 4 हजार 265 बालकांना दिनांक 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिदिनी आरोग्य विभागामार्फत प्रत्येक आश्रम शाळा तसेच मदरसा येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक लसीकरण चमूची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात कार्यशाळा आयोजित करून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांची ऑनलाइन कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित करण्याच्या सूचना दिल्या. लसीकरणाचे महत्त्व त्यांना पटवून देऊन शंभर टक्के मुलांना लसीकरण होण्यासाठी त्यांच्या मार्फत समन्वय साधून लसीकरण मोहीम यशस्वी करावी असे सांगितले. काही आश्रम शाळांमध्ये नवरात्रीनिमित्त सुट्टी असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुद्धा सर्व मुलांना लस मिळेल याची व्यवस्था आरोग्य विभागांने करावी, असे त्यांनी पुढे सूचना केल्या.
