कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा सकल मराठा समाजातर्फे आज, शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फीती लावून निदर्शने करण्यात आली.
मराठा समाजाची मुले जर नक्षली झाली तर त्याला सरकार जबाबदार राहील, राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
जालना येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.
त्यानंतर खाली डोके वर पाय, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
दंडावर काळ्या फीती लाउन शिवाजी चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मराठा समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, स्वत:ची व्होट बँक तयार करेल अशी माहिती बाळ घाटगे यांनी दिली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या जालन्यात आहेत. ते कोल्हापूरात आल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरेल अशी माहिती राजू सावंत यांनी दिली.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, राजमाता जिजाउ ब्रिगेड आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी बाळ घाटगे, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, किशोर घाटगे, विनायक पोवार, प्रकाश पाटील, संजय पवार, हणमंत पाटील, उदय लाड, पांडुरंग दिवसे, अरुण काशीद, जगदीश शेळके, सुनीता पाटील, छाया जाधव, लता जगताप, सुवर्णा मिठारी, सुधा सरनाईक, माई वाडेकर, रेश्मा पवार, भारती दिवसे आदी उपस्थित होते.