कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस पाच दिवस बेळगाववरून, हजारो प्रवाशांना भुर्दंड

0
95

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील कुडची ते उगार खुर्दच्या दरम्यान मिरज लोंढा दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक घेतल्याने तसेच तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेससह काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

काही गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्या उशिराने सुटणार आहेत. याचा फटका भक्तांना बसणार आहे.

हरिप्रिया एक्स्प्रेस पाच दिवस उद्यापासून बेळगाववरून सुटणार आणि पोहोचणार आहे. या मार्गावर कोल्हापुरातून प्रवास करणाऱ्या हजारो पर्यटकांना बेळगावपर्यंतचा आणि तेथून परतीच्या मार्गापर्यंतचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस या काळात बेळगाववरून सुटेल आणि तिरुपतीवरून कोल्हापूरला येणारी गाडी बेळगाव येथे थांबविण्यात येईल. मात्र, या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील कुडची ते उगार खुर्दच्या दरम्यान मिरज-लोंढा दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द केल्या आहेत.

गाडी क्रमांक १७४१५ तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस ३ सप्टेंबरपासून ७ सप्टेंबरदरम्यान बेळगावपर्यंतच धावेल आणि हीच गाडी क्रमांक १७४१६ या मार्गावर ४ पासून ८ सप्टेंबरदरम्यान बेळगाव येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.

या गाड्या केल्या आहेत रद्द
गाडी क्रमांक १७३३१ मिरज-हुबळी एक्स्प्रेस ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान रद्द केली आहे. हीच गाडी क्रमांक १७३३२ याच मार्गावर ४ पासून ८ सप्टेंबरपर्यंत धावणार नाही. गाडी क्रमांक १७३३३ मिरज-कॅन्सरलॉक एक्स्प्रेस ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान रद्द केली आहे. परतीच्या मार्गावर धावणारी ही गाडी क्रमांक १७३३४ ही रद्द केली आहे.

या गाड्या धावणार एक तास उशिराने
गाडी क्रमांक १६५९० मिरज-बेंगलोर राणी चन्नम्मा एक्स्प्रेस ३,४,५ आणि ८ सप्टेंबर रोजी एक तास उशिराने धावणार आहे. तर, १६५४२ पंढरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ही गाडी ८ सप्टेंबर रोजी एक तास उशिराने धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली.

या मार्गावरील प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेचे कोल्हापूर स्थानकप्रमुख विजय कुमार यांनी केले आहे. दरम्यान, अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यंटकांसाठी या काळात बेळगावहून कोल्हापूरपर्यंत स्वतंत्र बसची मागणी प्रवाशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here