कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू – मा. श्रीराम साळुंखे

0
290

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणी सहविचार सभेत शिक्षकांचा निर्धार“

शिक्षकांच्या सर्वांगीण प्रश्नांची जाण असणारा आपला हक्काचा शिक्षक आमदार विधान परिषदेत पोहोचविण्याची वेळ आता आली आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा लाभलेले श्री कौस्तुभ गावडे हेच शिक्षक समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या विजयासाठी आम्ही जीवाचे रान करू,” असा ठाम निर्धार पुणे विभाग प्रचारप्रमुख मा. श्रीराम साळुंखे यांनी व्यक्त केला.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, कोल्हापूर येथे पुणे विभाग शिक्षक मतदार नोंदणीसाठी आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, होते.
प्रचारप्रमुख श्रीराम साळुंखे म्हणाले, “विकसित समाजनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न जाणणारा, शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारा आमदार विधान परिषदेत पोहोचला पाहिजे. प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याने आणि शिक्षकाने मतदार नोंदणी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा पाया भक्कम करावा.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने आतापर्यंत तीन वेळा शिक्षक आमदार विधान परिषदेत पाठविले आहेत. आजच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांच्या हक्कांसाठी आवाज उठविणारा उमेदवार म्हणून श्री कौस्तुभ गावडे यांचा विचारपूर्वक अंगीकार आवश्यक आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत जास्तीत जास्त शिक्षकांनी नावे नोंदवून गावडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे.”

या सहविचार सभेत कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री भूपाल कुंभार यांनी मतदार नोंदणीचा आढावा सादर करून शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी श्री कौस्तुभ गावडे यांनी आपले विचार मांडताना म्हटले, “जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, टप्पा अनुदान, पवित्र प्रणाली, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती आणि वेतनेत्तर अनुदान या शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिक्षकांचा सन्मान राखणे आणि शिक्षणव्यवस्थेला योग्य दिशा देणे हेच माझे ध्येय आहे.”

सभेला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक मतदार नोंदणीचे जिल्हा व तालुकाप्रमुख, बुथप्रमुख तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी शिक्षकांनी एकमुखाने ठराव घेत —
“कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू!” — असा नारा दिला आणि संपूर्ण वातावरण निर्धारमय झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here