
प्रतिनिधी : जानवी घोगळे
बेंगलोर (कर्नाटक):
ग्लोबल स्विमिंग सर्विसेस बेंगलोर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावचा होतकरू जलतरणपटू भगतसिंग गावडे याने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत 50 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले. सुरुवातीपासून दमदार लय राखत आणि शेवटच्या टप्प्यात वेगात केलेल्या वाढीमुळे त्याने रौप्यपदकावर आपला हक्क सिद्ध केला.
स्पर्धेनंतर आयोजित सन्मान समारंभात भगतसिंगला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे बेळगावसह संपूर्ण परिसरात त्याचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
भगतसिंग गावडे हा जलतरण क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशासाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्याने अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके मिळवत आपली ओळख एक कुशल जलतरणपटू म्हणून निर्माण केली आहे. सध्या तो बेळगाव येथील के.एल.ई. स्विमिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत असून त्याच्या प्रगतीच्या प्रवासात प्रशिक्षकांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभत आहे.
त्याला अजिंक्य मेंडके, राजेश शिंदे, अतुल धुडूम, इम्रान सर, गोर्धन सर, सतीश यादव, संजू सर आणि महेश सर यांचे नेमके व तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे. तसेच केएलई इंटरनॅशनल स्कूल, स्विमिंग पूल – कुवेंपूनगर, बेळगाव येथील स्टाफनेही आवश्यक सहकार्य आणि प्रोत्साहन दिले.
भगतसिंगच्या प्रगतीत रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर (हिंडलगा) आणि उमेश कलघटगी यांनी दिलेला आर्थिक व नैतिक पाठिंबा मोलाचा ठरला आहे.
भगतसिंग गावडेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, क्लब तसेच ग्रामस्थांकडून त्याचे जोरदार अभिनंदन होत आहे. पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही तो असाच देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

