
प्रतिनिधी : जानवी घोगळे
रायफल शूटिंगमध्ये वैयक्तिक व सांघिक दोन कांस्य पदकांची कमाई…टोकियो (जपान) :दि. १५ नोव्हेंबर २०२५ पासून जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या Deaf Olympics (मूक-बधिर ऑलिम्पिक स्पर्धा)मध्ये भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबईची कर्तबगार शूटिंगपटू कोमल वाघमारे हिने एअर रायफल शूटिंग या प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत वैयक्तिक व सांघिक अशा दोन ब्रॉन्झ (कांस्य) पदकांवर आपले नाव कोरले आहे.कोमल वाघमारे सध्या एस.एन.डी.टी. वूमन्स युनिव्हर्सिटी, मुंबई येथे सायकोलॉजी (मानसशास्त्र) विषयात मास्टर्सच्या अंतिम वर्षाला शिकत असून, शूटिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण ती लक्ष शूटिंग अकॅडमी, पनवेल येथे घेत आहे.

शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्याने परिश्रम घेत तिने जागतिक स्पर्धेत यश मिळवत भारताचा राष्ट्रध्वज उंचावला आहे.कोमल ही आपल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री. मिलिंद चिंतामण वाघमारे यांची कन्या आहे. आपल्या मुलीच्या या यशामुळे संपूर्ण वाघमारे कुटुंबासह नवी मुंबई पोलीस दलात आणि परिसरात आनंदाची लाट उसळली आहे.कोमलच्या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, विद्यार्थी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी तिला शुभेच्छांचा kवर्षाव केला आहे. ही कामगिरी केवळ तिच्यासाठीच नव्हे तर इतर दिव्यांग खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरणारी आहे.कोमल वाघमारे हिला या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!तिच्या पुढील लक्ष्याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

