
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा – आशिष कोठावळे
प्रतिनिधी : रोहित डवरी
मजले (ता. हातकणंगले) गावाला तालुक्याशी जोडणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, महिला व रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र खराब रस्त्यामुळे लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले असून रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिकच वाढतो आहे.
ग्रामपंचायतीमार्फत संबंधित विभागांना अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. “रस्ता कधी होणार?” या प्रश्नाचे उत्तर देण्यास कोणताही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी तयार नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मजलेसारख्या छोट्या गावाकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शेतमाल वाहतूक, दैनंदिन कामकाज तसेच आपत्कालीन सेवांवरही विपरीत परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आशिष कोठावळे यांनी तीव्र इशारा दिला आहे.
“मजले ते हातकणंगले हा मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करून पूर्ण करण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर मजले गावाकडून सामूहिक बहिष्कार टाकण्यात येईल,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
रस्ता प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचेही संकेत मिळत आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मजले ग्रामस्थांकडून होत आहे.

