“उत्कृष्टतेचा ध्यास क्षमतांना संधी देतो” — लेफ्टनंट सई जाधव

0
66

विवेकानंद महाविद्यालयात लेफ्टनंट सई जाधव यांचा गौरवपूर्ण सत्कार
कोल्हापूर, दि. २४ (प्रतिनिधी): पांडुरंग फिरिंगे
विद्यार्थीदशेतील अभ्यासक्रमासोबत विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा मिळते आणि त्यातून करिअरसाठी संधींचे नवे दरवाजे खुलतात. मिळालेल्या संधींचे योग्य व्यवस्थापन करून बौद्धिक, भावनिक व मानसिक विकास साधता येतो. देशसेवा व समाजसेवेसाठी भारतीय सैन्यदल हे सर्वोत्तम व्यासपीठ असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), सीडीएस, टेक्निकल एन्ट्री स्कीम, जज ॲडव्होकेट जनरल (JAG) आदी मार्गांतून कमिशन्ड ऑफिसर होता येते, असे प्रेरणादायी मत लेफ्टनंट सई जाधव यांनी व्यक्त केले.
त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित विवेकानंद कॉलेज येथे आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. लेफ्टनंट सई जाधव या सत्कारमूर्ती महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, विद्यार्थीदशेतील हरहुन्नरीपणाला धैर्य व संयमाची जोड दिल्यास उर्जेला सकारात्मक दिशा देता येते आणि अंतर्सिद्धी साधता येते. परमपूज्य बापूजींच्या विचारांनी प्रेरित विवेकानंद शिक्षण संस्था व विवेकानंद कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम व्यासपीठ आहे, यातूनच विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करिअर घडवावे, असे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी विवेकानंद शिक्षण केंद्र समाजाला ध्येयदृष्टी असलेले, मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडवत असल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत परीक्षा विभागप्रमुख डॉ. जी. जे. नवाथे यांनी केले. लेफ्टनंट जितेंद्र भरगोंडा यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम डॉ. श्रुती जोशी (आय.क्यू.ए.सी. प्रमुख), मेजर सुनिता भोसले, प्रबंधक श्री सचिन धनवडे यांच्या नियोजनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. सूत्रसंचलन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास प्रा. गीतांजली साळुंखे, प्राध्यापकवर्ग, मेजर संदीप जाधव परिवार, एन.सी.सी. कॅडेट्स, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना आणि करिअरविषयक नवी प्रेरणा निर्माण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here