
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, कोतोली येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंच्या जल्लोषात आणि स्पर्धात्मक वातावरणात क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली.
उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले की, “क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होतो. खेळातून नेतृत्वगुण, संघभावना, शिस्त व जिद्द निर्माण होते. अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व देऊन शरीर सुदृढ ठेवा आणि महाराष्ट्र व देशाचा अभिमान वाढवणारी कामगिरी क्रीडा क्षेत्रात करा. खेळ हा केवळ स्पर्धा नसून राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे.”
या क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्या डॉ. उषा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महोत्सवांतर्गत प्रथम ज्युनिअर सायन्स व आर्ट्स विभागासाठी दोन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुला-मुलींसाठी खो-खो, कबड्डी या सांघिक स्पर्धांसह लांब उडी, गोळाफेक व धावणे अशा वैयक्तिक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
स्पर्धांचे यशस्वी संचालन प्रकाश लव्हटे, रविंद्र चौगुले, उत्तम पवार, शदरचंद्रिका लिगाडे, प्रतिभा पाटील, स्मिता कुंभार, सीमा पाटील, विश्वेजा पाटील, सुधीर पाटील व सुजाता पाटील यांनी पंच म्हणून केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन क्रीडा संचालक प्रा. संग्रामसिंह मोरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संजीव कुमार यांनी मांडले तर आभार प्रदर्शन प्रा. आर. बी. पाटील यांनी केले.
खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे क्रीडा महोत्सव अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला.
फोटो ओळ :
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्यासोबत क्रीडा संचालक प्रा. संग्रामसिंह मोरे, प्रा. संजीव कुंभार व अन्य शिक्षकवर्ग.

