विवेकानंद महाविद्यालयात ‘किसान दिन’ उत्साहात साजरा

0
122

विद्यार्थी–शेतकरी थेट संवादातून देशी वाणांची जनजागृती

प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा ‘किसान दिन’ कळंबा येथील शेतामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आधुनिक व पारंपरिक शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण केली.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी हितासाठी घेतलेले निर्णय आजही प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या किसान दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला.
यावेळी बी.एस्सी. भाग तीनच्या विद्यार्थ्यांनी कळंबा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. हवामान बदलाचे परिणाम, वाढता उत्पादन खर्च, कीड-रोग नियंत्रण, पाण्याची उपलब्धता तसेच बाजारपेठेतील अडचणी यावर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी देशी वाणांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन, कमी खर्चात शाश्वत उत्पादन, तसेच पर्यावरणपूरक शेती पद्धती याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
देशी बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता टिकून राहते व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित अन्ननिर्मिती शक्य होते, याबाबत शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या संवादातून दोन्ही घटकांना अनुभवसंपन्न ज्ञानाची देवाणघेवाण झाली.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. भाऊराव दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. अभिजीत कासारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच समाजाशी नाते दृढ करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक जाणिवा निर्माण करणारा ठरला. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून शेतकरी व शिक्षणसंस्था यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here