
शाहुवाडी | प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाकरे सेनेच्या युवासेना संघटनेत शाहुवाडी तालुक्यासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा करण्यात आली असून, वरेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आनंद भोसले यांची युवासेना शाहुवाडी तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मातोश्रीच्या आदेशाने झालेल्या या निवडीमुळे शाहुवाडी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
ही निवड शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, शिवसेना नेते संजय पवार, विजय देवणे तसेच जिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांच्या हस्ते आनंद भोसले यांना निवडीचे अधिकृत पत्र देऊन करण्यात आली.
ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे व युवासेना सचिव आ. वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
या निमित्ताने आज शाहुवाडी तालुका शिवसेना शाखेत नवनिर्वाचित तालुकाप्रमुख आनंद भोसले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व युवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले,
“आनंद भोसले हे एकनिष्ठ शिवसैनिक असून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. गोरगरीब व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. युवकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शाहुवाडीसारख्या दुर्गम तालुक्याची त्यांना सखोल माहिती असून, येथील प्रश्नांची जाण असल्यामुळे ते प्रभावी नेतृत्व करतील. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत अपेक्षित यश मिळाले नसले तरी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत शाहुवाडी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निश्चितच घवघवीत यश मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख नामदेव गिरी म्हणाले,
“आनंद भोसले हे जिद्दी, तळमळीचे व लढवय्ये नेतृत्व आहे. शिवसेनेसाठी ते प्रामाणिकपणे कार्य करतील व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देतील.”
यावेळी जिल्हाध्यक्ष अभिनंदन सोळांकुरे, प्रकाश खोत, कृष्णा भोसले यांच्यासह असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून शाहुवाडी तालुक्यात युवासेना संघटना अधिक मजबूत होणार असून, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत जनतेच्या सेवेसाठी भोसले यांचे कार्य निर्णायक ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

