डॉ. माधवी जाधव ‘सारस्वत सन्मान’ने गौरविण्यात आल्या

0
33

कोल्हापूर प्रतिनिधी:पांडुरंग फिरिंगे

महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या वतीने हिंदी भाषा, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील हिंदीच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. माधवी शिवाजीराव जाधव यांना ‘सारस्वत सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.महाराष्ट्र हिंदी परिषदेचे ३२वे अधिवेशन व दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र शनिवारी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे उत्साहात सुरू झाले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते डॉ. जाधव यांना पुरस्काराची रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल काळे, मुख्य सचिव डॉ. गजानन चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. चंद्रदेव कवडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंत मोरे, माजी विभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. गजानन चव्हाण, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, तसेच डॉ. पंढरीनाथ पाटील, डॉ. देवीदास बामणे, डॉ. नाजिम शेख, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. सुरेश शेळके, डॉ. विठ्ठलसिंह ढाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. माधवी जाधव यांना यापूर्वी सर्वोत्कृष्ट शिक्षक मार्गदर्शक पुरस्कार (अनंत करंडक) तसेच ‘स्वामिनी’ राज्यस्तरीय पुरस्कार (अविष्कार फाउंडेशन) मिळाले आहेत. त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून विशेष ओळखल्या जातात.डॉ. जाधव यांना पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अध्यापनाचा ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक समित्यांवर महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, अधिवेशनांमध्ये त्यांनी अध्यक्ष व विषयतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले आहे.संत साहित्य व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची त्या गाढ अभ्यासक असून कोल्हापूर व सांगली आकाशवाणी केंद्रावर त्यांची व्याख्याने प्रसारित झाली आहेत. त्यांनी १०० हून अधिक व्याख्याने दिली असून आंतरराष्ट्रीय काव्यमंच व महाराष्ट्रातील महिला काव्यमंचावर सक्रिय सहभाग घेतला आहे. पाठ्यपुस्तकांसाठी संपादक व लेखक म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे. विविध विषयांवरील त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या असून त्यांनी यूजीसीचा मेजर रिसर्च प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here