
पाचगाव | प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
गट नं. ४०, मौजे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सन २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून ऋषिकेश उमेश हुन्नूरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, महाविकास आघाडी अधिक बळकट करण्याच्या व्यापक व उदात्त हेतूने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे.दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आदरणीय मा. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, मा. आमदार ऋतुराज दादा पाटील, मा. पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव दादा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. रोहितदादा पाटील तसेच पक्षातील इतर मान्यवर, सहकारी व मतदार बंधू-भगिनी यांच्या शब्दास मान देत ऋषिकेश हुन्नूरे यांनी हा निर्णय घेतला.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत जिल्हा परिषद उमेदवार मा. संग्राम पाटील व पंचायत समिती उमेदवार डॉ. शिल्पा हजारे यांना स्वतःचा व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा जाहीर आणि ठाम पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे पाचगाव मतदारसंघात महाविकास आघाडीची एकजूट अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या प्रसंगी पाचगाव, आर. के. नगर व मोरेवाडी येथील सर्व गटनेते, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी ऋषिकेश हुन्नूरे यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.“मतदार बंधू-भगिनींनी दिलेले प्रेम, आशीर्वाद व निर्भीड साथ हीच माझी खरी ताकद आहे. हीच ऊर्जा घेऊन मी कायम आपल्या सेवेसाठी तत्पर व कटीबद्ध राहीन,” असे भावनिक मनोगत ऋषिकेश हुन्नूरे यांनी यावेळी व्यक्त केले.या राजकीय घडामोडीमुळे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार व निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

