
कोतोली (प्रतिनिधी): पांडुरंग फिरींगे
कोतोली व कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या मतदारसंघातील चार पंचायत समिती उमेदवार व दोन जिल्हा परिषद उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणूक रणधुमाळीला निर्णायक वळण मिळाले आहे.
“या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून आम्ही त्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत,” असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल पाटील यांनी बाजार भोगाव येथे आयोजित भव्य जाहीर सभेत केले.
राहुल पाटील म्हणाले की, कोतोली–कळे मतदारसंघात विकासाभिमुख आणि जनतेशी नाळ जुळलेले उमेदवार उभे असून जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा संघर्षात आणि विकासात कायम सोबत राहील.
आमदार विनय कोरे यांचे तरुणांना सडेतोड आवाहन
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार विनय कोरे यांनी तरुण कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन केले.

“झालेल्या चुका काढत बसण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी संघटितपणे काम करा. ही निवडणूक भविष्य घडवणारी आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार कोरे यांनी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की,
“राहुल पाटील यांना आमदार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” या शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी व धनंजय महाडिक युवा शक्तीचा जाहीर पाठिंबा
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह धनंजय महाडिक युवा शक्ती पक्षाकडूनही जाहीर पाठिंबा देण्यात आला.
विशेष म्हणजे मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी मंचावर येत जनसुराज्य पक्षाला उघड पाठिंबा दिला, यामुळे सभेला तरुणाईची ऊर्जा आणि जोश मिळाला. या पाठिंब्यामुळे मतदारसंघातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर जनसुराज्यच्या बाजूने एकवटत असल्याचे स्पष्ट झाले.
दिग्गज नेते व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती
या जाहीर सभेस माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, बाळासाहेब मोळे, आनंदा तेली, युवराज बेलेकर, ॲड. शाहू काटकर, रोहन गुरव, बळवंत पाटील, पांडुरंग काशीद, दामोदर गुरव यांच्यासह
जनसुराज्य पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय महाडिक युवा शक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सभेदरम्यान अनेकांनी जनसुराज्य पक्षाला जाहीर पाठिंबा देत आगामी निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
निवडणूक रंगात, राजकीय समीकरणांना नवा आकार
या जाहीर पाठिंब्यामुळे कोतोली–कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची, निर्णायक व राज्यभर लक्ष वेधणारी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


