कोल्हापुरात ऊस वाहतुकीचा थरार ! जुना बुधवार पेठेत उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

0
124


कोल्हापूर (प्रतिनिधी): पांडुरंग फिरींगे
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या तोरस्कर चौकात (जुना बुधवार पेठ) आज पहाटे सुमारे तीनच्या सुमारास उसाने ओव्हरलोड भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून भीषण अपघात घडला. या अपघातात रस्त्यालगत असलेली मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून, परिसरातील नागरिकांच्या घरांच्या तळघरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नव्हती. अन्यथा या दुर्घटनेत जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे उसाने क्षमतेपेक्षा अधिक भरलेला ट्रॅक्टर तोरस्कर चौकातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॉली पलटी झाली. अपघाताचा धक्का इतका तीव्र होता की, रस्त्याखाली असलेली मुख्य जलवाहिनी जागीच फुटली. यामुळे परिसरात पाण्याचे लोंढे वाहू लागले आणि अनेक घरांच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. संसारोपयोगी साहित्य, वाहने व साठवलेला माल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नागरिकांचा संताप; प्रशासनाला इशारा
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मध्यवस्तीतून ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर सर्रासपणे धावत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अरुंद रस्ते, वळणावळणाचे चौक आणि रहदारी असूनही वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या प्रकाराला कंटाळून जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे.

नागरिकांच्या ठाम मागण्या
शहराच्या मध्यवस्तीतून ऊस वाहतूक तातडीने बंद करावी
ऊस वाहतुकीसाठी शहराबाहेरून स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करावा
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी
जर प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर शहराच्या मध्यवस्तीतून जाणारी ऊस वाहतूक अडवून मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
“शहरातील अरुंद रस्त्यांवरून अशी जीवघेणी वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? आज फक्त मालमत्तेचे नुकसान झाले आहे, उद्या एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण? प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी.”
— स्थानिक नागरिक, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here