
प्रतिनिधी :प्रमोद पाटील
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीतील पाचगाव मतदारसंघात तामगाव गावाने काँग्रेस पक्षाला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी विविध प्रश्नांमुळे तामगाव ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्ह्यातील सर्वपक्षीय वरिष्ठ नेते तसेच जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने आणि हस्तक्षेपाने ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लागले असून, आता गावाने लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केला आहे.
याच पार्श्वभूमीवर तामगावच्या जनतेने काँग्रेसचे जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार संग्राम पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार शिल्पा हजारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गावातील बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखाने हा निर्णय जाहीर करत विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका घेतली.
सुमारे ४ हजार लोकसंख्या असलेल्या तामगावला दोन MIDC क्षेत्रांची शेजारील सीमा लाभलेली आहे. त्यामुळे रोजगार, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सोयीसुविधा याबाबत विकासाच्या मोठ्या संधी असूनही त्या पुरेशा प्रमाणात प्रत्यक्षात आल्याचा अभाव असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार सकारात्मक आणि ठोस भूमिका घेतील, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.
तामगावच्या या निर्णयामुळे पाचगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसला या भागात बळकटी मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीत तामगावचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


