
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर — संघभावना, सातत्य आणि शिस्त या त्रिसूत्रीचा प्रत्यय देत कोल्हापूरातील बालस्केटिंगपट्टूंनी सलग १ तास २६ मिनिटे २६ सेकंद नॉनस्टॉप स्केटिंग करत एक अनोखा विक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे.

हा विक्रम मल्टिपल व्हेन्यू (एकाच वेळी अनेक ठिकाणी) या संकल्पनेतून राबवण्यात आला. एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि यूएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद व्हावी यासाठी आवश्यक सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. या जागतिक उपक्रमाचे आयोजन एस के रोलर स्केटिंग अकॅडमी, बावडा यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले.
या विक्रम मोहिमेत सहभागी झालेल्या बालस्केटिंगपट्टूंनी उल्लेखनीय चिकाटी, शारीरिक क्षमता आणि मानसिक एकाग्रता दाखवत अखंड स्केटिंग पूर्ण केले. सहभागी खेळाडूंमध्ये स्पृहा चौगुले, अहिल्या चौगुले, अनिका गजानन पाटील, वेद उलपे, भावना सचिन पाटील, स्वराली निंबाळकर, राजलक्ष्मी पाटील, मुहम्मद कोठीवाले, अहमद कोठीवाले, अभिविश्वा बेंद्रे, सानवी पन्हाळकर, विवान कांबळे, जैद मुल्ला, हर्षल पाटील, स्वराज्ञा बिदरेवाडी, साची सातिजा, रोनक सतीजा, राजवीर पवार, आर्या पाटील, वामशी पुजारी, रुझैन मुजावर, सचिन भाटिया, आराध्य अडसुले, मंथन ओसवाल, सुजल कुंभार, गुरजास मेंघानी, मिती राठोड यांचा समावेश होता.

या उपक्रमामुळे कोल्हापूरचे नाव क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानाने झळकले आहे. लहान वयातही मोठे ध्येय ठेवून ते पूर्ण करण्याची जिद्द या बालस्केटिंगपट्टूंनी दाखवून दिली. प्रशिक्षक, पालक आणि आयोजक यांच्या मार्गदर्शनामुळेच ही कामगिरी शक्य झाल्याची भावना सहभागी खेळाडूंनी व्यक्त केली.
या विक्रमाची अधिकृत नोंद संबंधित जागतिक संस्थांकडे पाठवण्यात आली असून, लवकरच त्यास मान्यता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरच्या क्रीडाविश्वात हा दिवस प्रेरणादायी ठरला आहे.



