
कोल्हापूर(प्रतिनिधी):पांडुरंग फिरंगे
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दिशा देणाऱ्या आणि लेखनकौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या वार्षिक नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
शिवाजी विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या साहित्यिक, कलात्मक आणि वैचारिक अभिव्यक्तीसाठी दरवर्षी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित केली जाते. शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विवेकानंद कॉलेजच्या ‘विवेक’ या वार्षिक नियतकालिकाने बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
गेली अनेक वर्षे सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत विवेकानंद कॉलेजने या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले असून यंदाही या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. विशेष म्हणजे, वैयक्तिक पारितोषिकांमध्येही विद्यार्थ्यांनी विविध साहित्यप्रकारांत एकूण 15 पारितोषिके पटकावत आपली सर्जनशील ताकद अधोरेखित केली.
या नियतकालिकाचे संपादक म्हणून प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. विभागीय संपादक म्हणून डॉ. कविता तिवडे, डॉ. आरिफ महात, डॉ. टी.सी. गौपाले, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. अशोक पाटील, प्रा. विश्वंभर कुलकर्णी, प्रा. एस.एस. जगताप, प्रा. सौ. यु.आर. हिरकुडे, प्रा. नदाफ एस.एच., प्रा. सतिश उपळावीकर, प्रा. संतोष कुंडले, डॉ. सुप्रिया पाटील, प्रा. राहुल इंगवले यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच ज्युनिअर व सिनिअर विभागातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे भरीव योगदान लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, सी.ई.ओ. श्री. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. थोरात, रजिस्ट्रार श्री. एस.के. धनवडे, तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी संपादक मंडळ आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
सर्जनशीलतेला व्यासपीठ देत गुणवत्ता आणि सातत्याची परंपरा जपणारे विवेकानंद कॉलेज पुन्हा एकदा शिखरावर पोहोचले आहे

