पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरीत सुरू झालीच पाहिजे

0
65

इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समिती
शनिवार दि. ९ सप्टेंबर – सुळकूड पाणी योजनेसाठी मानवी साखळी
इचलकरंजी दि. ७ – इचलकरंजी शहरातील ४ लाख नागरिकांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या सुळकूड पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरीत सुरू झालीच पाहिजे.

या मागणीसाठी सुरु असलेल्या जनजागरण मोहीमेच्या अंतर्गत शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ याप्रमाणे १ तास लो. टिळक पुतळा ते म. गांधीजी पुतळा ते छ. शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ ते रा. शाहू महाराज पुतळा याप्रमाणे मेन रोडवर शांततापूर्ण मार्गाने रस्त्याच्या बाजूने मानवी साखळी करण्याचे आवाहन कृति समितीच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

या मानवी साखळीसाठी नागरिक, महिला, विद्यार्थी सर्वांनी हजारोंच्या संख्येने सकाळी ठीक ९.४५ वाजता बॅनर्स अथवा घोषणा फलकासह मेनरोडवर उपस्थित रहावे व ठीक १० वाजता एक तास मानवी साखळी मोहीम सुरु करावी असे आवाहन कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


राज्य सरकारने यासंदर्भात सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही जनजागरण मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या अंतर्गत आजअखेर २५००० पोस्टकार्डे मा. मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.

तसेच विभागवार सह्यांच्या मोहीमेमध्ये ५० हजार सह्या जमा झालेल्या आहेत अशीही माहिती कृति समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. पोस्टकार्डे वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे मोहीम लांबल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तथापि ही मोहीम पुढेही सुरु राहील व दि. ११ सप्टेंबर पर्यंत ५० हजार पोस्टकार्डे व १ लाख सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असेही कृति समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.


चंदुर ग्रामपंचायतीचे अभिनंदन – चंदुर ग्रामपंचायतीने सुळकूड पाणी योजनेला पाठिंबा देणारा ठराव केला आहे, याबद्दल आम्ही चंदुर ग्रामपंचायत, सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थ यांचे कृति समितीच्या वतीने मनःपूर्वक व जाहीर अभिनंदन करीत आहोत.

तसेच परिसरातील अन्य सर्व ग्रामपंचायतींनी अशाच स्वरूपाचे ठराव करावेत व कृति समितीला बळ द्यावे असेही जाहीर आवाहन करीत आहोत.


गणेशोत्सव देखावा स्पर्धा – शहरातील सर्व मंडळांना आवाहन इचलकरंजी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी कृति समितीच्या वतीने “पाणी प्रदूषण” या ज्वलंत विषयावरील देखावा स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.

“प्रदूषित पाणी, त्यामुळे होणारे आजार, इ.स. २०१२ मधील कावीळीचे बळी, अन्य विविध परिणाम, सुळकूड योजना व संबंधित बाबीं” वर शक्य त्या मंडळांनी देखावे करावेत आणि त्याची नोंद कृति समितीकडे करावी.

यापैकी चांगले व परिणामकारक देखावे करणाऱ्या मंडळांना पारितोषिके देण्यात येतील व सर्व मंडळांना “पाणी जनजागरण सहभाग” प्रशस्तीपत्रे देण्यात येतील असे कृति समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

कृपया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व मंडळांनी मंडळाचे नांव व संपूर्ण पत्ता, देखावा जागेचा संपूर्ण पत्ता, संबंधित पदाधिकारी वा जबाबदार व्यक्तीचे संपूर्ण नांव व मोबाईल क्रमांक ही माहिती कृति समिती कार्यालय अथवा संबंधित कार्यकर्ते यांच्याकडे द्यावी.

कृपया शहरातील व परिसरातील जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालय, महासत्ता चौक, येथे आज झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत.

प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये शशांक बावचकर, मदन कारंडे, अनिल डाळ्या, रवि रजपूते, महादेव गौड, प्रसाद कुलकर्णी, राहुल खंजीरे, कॉ. सदा मलाबादे, ध्रुवती दळवाई, रिटा रॉड्रिग्युस, सुष्मिता साळुंखे, कौशिक मराठे, भाऊसाहेब आवळे, रवि जावळे, राजू आलासे, अभिजित पटवा, विकास चौगुले, वसंत कोरवी, प्रताप पाटील, राहुल सातपुते, जाविद मोमीन, राजू कोन्नूर, संभाजी सुर्यवंशी इ. मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here