
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोतोली (ता. पन्हाळा) येथे आयोजित प्रचार फेरीदरम्यान भारतीय जनता पार्टी पुरस्कृत (अपक्ष) उमेदवार श्री. आनंद अंगठेकर यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समिती हे प्रभावी माध्यम ठरणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य, महिला-बालकल्याण आणि क्रीडा सुविधा बळकट करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ठोस आणि परिणामकारक पुढाकार घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अंगठेकर म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवून शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. डिजिटल शिक्षणाचा प्रसार करून विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम राबवले जातील.
आरोग्य सेवेसंदर्भात बोलताना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम करण्यावर भर दिला. गर्भवती माता, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित आरोग्य तपासणी, औषध पुरवठा आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण क्षेत्रात महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, कर्जपुरवठा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच अंगणवाड्या सक्षम करून बालकांच्या पोषण व आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील क्रीडा सुविधा मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांच्या खेळाच्या मैदानांची सुधारणा, आवश्यक तेथे नवीन मैदाने, क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जातील. “ग्रामीण भागातूनही दर्जेदार खेळाडू घडू शकतात; त्यासाठी सुविधा देणे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे,” असे अंगठेकर यांनी स्पष्ट केले.
वरील सर्व प्रश्नांची टप्प्याटप्प्याने सोडवणूक करून पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विकासाची गती वाढवली जाईल, अशी ग्वाही श्री. आनंद अंगठेकर यांनी यावेळी दिली.

