
कोल्हापूर, दि. ६ (प्रतिनिधी):पांडुरंग फिरींगे
ओबीसी, भटके-विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय समाजातील मतदारांनी आपल्या भावी पिढ्यांचे संविधानिक न्यायहक्क सुरक्षित ठेवण्यासाठी राजकीय मतपेटीच्या लढाईत सक्रिय सहभाग घ्यावा व मुळ आणि खऱ्या ओबीसी उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन ओबीसी जनमोर्चाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर यांनी केले.
ओबीसी जनमोर्चातर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मागास प्रवर्गातील काही मतदारसंघांमध्ये बोगस कुणबी जातीचे दाखले मिळवून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमुळे खऱ्या ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. अशा उमेदवारांऐवजी मुळ व खऱ्या ओबीसी उमेदवारांना संधी देणे ही काळाची गरज आहे. तरच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्षात मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचू शकतो.यावेळी ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सचिव दिगंबर लोहार म्हणाले, “ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय हिस्सेदारी ठोसपणे अधोरेखित करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मुळ ओबीसी उमेदवारांना मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७५ टक्के लोकसंख्या असलेल्या मागासवर्गीय समाजाला सक्षम बनवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन मतपेटीच्या लढाईला बळ द्यावे.”
ओबीसी नेते व महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनीही यावेळी मत व्यक्त करताना सांगितले की, “ओबीसी समाजाच्या न्यायहक्कांसाठी मतपेटीची लढाई निर्णायक आहे. शासन व्यवस्थेत मुळ ओबीसी व मागासवर्गीयांना योग्य स्थान मिळालेच पाहिजे. यासाठी सर्वांनी एकजूट दाखवत सत्तेत सहभाग वाढवावा.”
या बैठकीत पंडित परीट, सचिन सुतार, चंद्रकांत कोवळे, एकनाथ कुंभार, नामदेव सुतार, किशोर लिमकर, शौकत शिगावे, विजय घारे, दत्तात्रेय सातार्डेकर, शामराव खोत आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास अजय अकोलकर, सुनील महाडेश्वर, अनिल खडके, सुखदेव सुतार, सचिन लोहार, विनायक परीट, संजय भालकर, दिलीप गवळी, सुनील सावर्डेकर, सुनील विभुते, संजय लोहार, सतीश सुतार, अनिल सुतार, सागर भोसले, संभाजी भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

