पाचगावरकर संग्राम पाटील यांच्या पाठीशी – आमदार सतेज पाटील ,कॉग्रेसचे उमेदवार विजयी करा खासदार शाहू महाराज

0
19


पाचगाव प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
पाचगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात विकास, शांतता आणि सक्षम नेतृत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत काँग्रेसचे उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील यांच्या प्रचाराला वेग आला आहे. “पाचगावमध्ये शांतता हवी असेल आणि विकासाची गंगा अखंड वाहती ठेवायची असेल, तर संग्राम पाटील यांना विजयी करा,” असे ठाम आवाहन आमदार सतेज पाटील यांनी पाचगाव येथील जाहीर प्रचारसभेत केले. आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले की, “माजी सरपंच असताना संग्राम पाटील यांनी विरोधकांकडूनही निधी खेचून आणून पाचगावच्या विकासासाठी प्रभावीपणे वापर केला. निधी मिळवण्याची क्षमता, काम करण्याची जिद्द आणि जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्व हीच त्यांच्या कामाची ओळख आहे.” त्यामुळेच पाचगावच्या सर्वांगीण विकासासाठी संग्राम पाटील यांना विजयी करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी ठसक्यात सांगितले.

सभेत बोलताना संग्राम गोपाळराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा सविस्तर आढावा घेतला. “मी सरपंच असताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली. आज पत्नी प्रियांका पाटील सरपंच असताना देखील कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. विरोधक म्हणतात आम्ही काम केले नाही; पण मी केलेली प्रत्येक कामे आमदार व खासदार यांना हाताला धरून दाखवायला तयार आहे,” असे स्पष्ट आणि ठाम विधान त्यांनी केले. रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामविकास, नागरी सुविधा यांसह विविध मूलभूत प्रश्नांवर केलेल्या कामांची माहिती देत त्यांनी जनतेचा विश्वास अधिक दृढ केला.

यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज यांनीही उपस्थितांना संबोधित करत “काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे,” असे आवाहन केले. सक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारधारा यासाठी पाचगावच्या मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.या प्रभावी प्रचारसभेला विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभास्थळावर उत्साहाचे वातावरण असून ‘विकास, शांतता आणि विश्वास’ या मुद्द्यांवर संग्राम पाटील यांच्या बाजूने मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून आला.पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ही लढत केवळ निवडणूक न राहता विकासाच्या दिशेने निर्णायक पाऊल ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here