
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
पन्हाळा तालुक्यात सध्या एकच चर्चा रंगली आहे—जनतेच्या मनातील विश्वासाचं नाव म्हणजे पूजा दिलीप पाटील! कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचे स्पष्ट होताच पन्हाळ्यातील कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने एकमुखी मागणी लावून धरली आहे—“अध्यक्षपद पूजा पाटील यांनाच द्या!”
यवलूज मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवत पूजा पाटील यांनी प्रस्थापित राजकारणाला धक्का दिला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, केवळ जनशक्ती, निस्वार्थ सेवा आणि विकासाची तळमळ या बळावर त्यांनी विजय मिळवला. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नाही, तर सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा-आकांक्षांचा आणि लोकशाहीच्या सामर्थ्याचा आहे.
पद मिळण्यापूर्वीच पाटील कुटुंबाने स्वखर्चातून मतदारसंघात राबवलेल्या विकासकामांमुळे जनतेच्या मनात विश्वासाची मजबूत वीट रचली गेली आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उभं केलेलं काम हे केवळ आश्वासनांपुरतं मर्यादित नसून कृतीतून साकारलेलं आहे. त्यामुळेच “काम बोलतं” हे वाक्य त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरं ठरतं.
घराणेशाहीच्या राजकारणाला छेद देत एका सामान्य कुटुंबातील सुशिक्षित आणि अभ्यासू महिलेने मिळवलेला हा विजय पन्हाळ्याच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. ‘स्मार्ट शाळा’ आणि ‘गाव तिथे क्रीडांगण’ यांसारख्या दूरदृष्टीच्या संकल्पना मांडत त्यांनी विकासाचा नवा आराखडा समोर ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात विकासाच्या शर्यतीत अव्वल येईल, असा ठाम विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत.
पन्हाळ्यातील कार्यकर्ते स्पष्ट शब्दांत सांगत आहेत—“जनतेने ज्या विश्वासाने पूजा पाटील यांना निवडून दिलं, तो विश्वास आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदातून सन्मानित व्हायला हवा.”
आता सर्वांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लागल्या आहेत. पन्हाळ्याच्या जनतेच्या भावना आणि पूजा पाटील यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन पक्ष नेतृत्व ऐतिहासिक निर्णय घेणार का?
पन्हाळ्यातून उठलेला हा भावनिक आवाज आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात घुमू लागला आहे…!

