प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
समोर आलेल्या माहिती नूसार दोन कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली आहे. संजय राव उर्फ दीपक असं या माओवाद्याचं नाव आहे.
संजयची पत्नीही माओवादी असून तिलाही बंगळूरूमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्रात देखील पन्नास लाखांचं बक्षीस आहे.
संजय हा उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेकपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तो गेल्या तीस वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे. तो माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य देखील आहे.
त्याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. त्याची माहिती देणाऱ्याला महाराष्ट्रात पन्नास लाखांचं तर इतर राज्यात मिळून दोन कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
दीपक हा महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथील मूळ रहिवासी असून, त्याने कश्मीरमध्ये बीटेकचं शिक्षण घेतल्यानंतर तो महाराष्ट्रात परतला. त्यानंतर तो माओवादी चळवळीत सक्रिय झाला.
महाराष्ट्रासह काही राज्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे 2015 मध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन जणांना अटक झाली होती.
त्यावेळी संजय तिथून निसटला होता. माओवादी चळवळीशी संबंधित काही साहित्य, शस्त्र आणि रोख रक्कम त्या ठिकाणी सापडली होती.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सध्या संजयकडे कोकणासह पश्चिम घाटात माओवादी चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तो पश्चिम घाट विशेष क्षेञ समितीचा सदस्य आहे. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे