प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: महसूल विभागाने सुधारित ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने शेतातील पीक पेरा नोंदणी करायची आहे. या ॲप वापराबाबत मंडल अधिकारी, तलाठी आणि कृषी सहाय्यकांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू आहे.
याबाबतची पाहणी आणि अधिक मार्गदर्शनाकरिता राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, राधानगरी कागल प्रांत सुशांत बनसोडे आणि तहसीलदार अनिता देशमुख यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हजेरी लावली.
राधानगरी तालुक्यात एकूण 131 महसुली गावांमध्ये एकूण 38 सज्जांसाठी 31 तलाठी आणि 6 मंडळ अधिकारी कार्यरत आहेत. तर 83 हजाराहून अधिक खातेदार शेतकरी आहेत.
खातेदार शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी असणारी महसूल यंत्रणा अपुरी पडू नये म्हणून खातेदार शेतकऱ्यांनी स्वयं स्फूर्तीने या राष्ट्रीय ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होणे जरुरीचे आहे.ई-पीक पाहणी मुळे कृषी गणना अचूक होईल आणि शेतकऱ्यांना पिक विमा व कृषी पतपुरवठा अधिक सुलभतेने उपलब्ध होईल.
तसेच शेतीशी संबंधित सर्व योजनांचा लाभही घेता येईल. यामुळे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन अप्परजिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांनी आवाहन केले आहे. यावेळी तलाठी शहाजी चिंदगे, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.