प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यात मारामारीच्या सलग घटना सुरुच असून आता मंगळागौर खेळताना मोठ्याचे हसल्याचे कारण झाल्याने दोन कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी होऊन राडा झाला.
इचलकरंजीमधील कबनूरमध्ये दोन कुटुंबामध्ये झालेल्या या वादात दगड, वीटा, चाकू घेऊन मारहाण झाली. या तुंबळ हाणामारीत कृष्णात शिवाजी जाधव, ललिता जाधव, सुलोचना शहाजी घाटगे, आकाश शहाजी घाटगे, आकांक्षा घाटगे जखमी झाले आहेत.दोन कुटुंबातील तुबळ हाणामारी नंतर रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांसह पाच जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कुटुंबाकडून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कबनूरमध्ये तिरंगा युवक कला क्रीडा मंडळ येथे महिला मंगळागौर खेळत होत्या.
यावेळी कृष्णात जाधव, मुलगा अक्षय आणि त्याच्या मित्राने मोठ्याने हसल्याचा जाब आकाश घाटगे व मुकेश घाटगे यांनी विचारला. यानंतर आकाशने जाधव यांची गळपट धरून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जाधव यांची पत्नी ललिता जाधव यांना उजव्या हातावर दगडाने मारून जखमी केले. मुकेशने दोघांना मारहाण व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीचा जाब विचारत कृष्णात जाधव यांनी सुलोचना घाटगे यांच्या घरी जावून विटेने मारहाण करून जखमी केले.
तसेच आकाशला अक्षयने चाकूने मारत जखमी केले. मुद्दसर घुणके यानं आकांक्षा घाटगे व सुलोचना घाटगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी इंचलकरजी शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला.
कृष्णात जाधव यांच्या फिर्यादीनुसार आकाश घाटगे, मुकेश घाटगे यांच्यावर तर सुलोचना घाटगे यांच्या फिर्यादीनुसार कृष्णात जाधव, अक्षय जाधव, मुदस्सर घुणके या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.