देवळी (वर्धा) : महालक्ष्मी कार्यक्रमानिमित्त आयोजित जेवणाच्या कार्यक्रमातून जेवण आटोपून दुचाकीने घरी जात असलेल्या वर्धा जिल्ह्यातील दोन जिवलग मैत्रिणींचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
हा अपघात शुक्रवारी (दि. २२) रात्री ८ वाजेच्या सुमारास बुट्टीबोरीनजीक झाला. दोन्ही तरुणींच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने पळगाव आणि कारंजा गावात शोककळा पसरली.
निकिता प्रमोद चौधरी (२३, रा. पळसगाव, ता. देवळी), वैष्णवी शंकर सरोदे (२५, रा. कारंजा घाडगे) असे मृत तरुणींची नावे आहेत. निकिता आणि वैष्णवी या दोघीही एकाचवेळी बी.एस्सीची (कृषी) पदवी घेऊन बोरखेडी येथील अंबुजा फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्प येथे नोकरीला लागल्या होत्या.
त्या दोघीही बोरखेडी नजीकच्या आष्टा येथून महालक्ष्मीचे जेवण आटोपून दुचाकीने परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पळसगाव व कारंजा दोन्ही गावात शोकाकुल वातावरण होते.
निकिता व वैष्णवी या दोघीही अविवाहित असून, बोरखेडी येथे किरायाच्या खोलीत राहत होत्या. पोळ्याच्या दिवशी निकिता पळसगाव येथे घरी आली असता तिच्या वडिलांनी तिला नवीन मोपेड घेऊन दिली होती.
निकिताच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ व आप्त परिवार आहे. शनिवारी सायंकाळी दोघींच्या पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.