नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूसत्र सुरुच, ४८ तासात बळींची संख्या ३१ वर, ६६ रुग्ण गंभीर

0
128

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे.

मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता.

या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील ४८ तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३१ पर्यंत गेली आहे. या घटनेनंतरही रुग्णालय प्रशासन गाफिल असल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात ३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते १ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या दीड ते तीन दिवसाच्या नवजात बालकांचा समावेश आहे.

यासोबतच सर्प दंश, विष प्राशन आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.दरम्यान आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

त्यात चार नवजात बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. सात रुग्णांच्या मृत्यूनंतर मागील ४८ तासात मृत्यूचा आकडा ३१ पर्यंत पोहचला आहे. त्यात १६ नवजात बालकांचा समावेश आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सध्याच्या घडीला १३८ नवजात बालकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

त्यात ३८ नवजात बालकांची प्रकृती अत्यवस्थ आहे. तसेच इतर २५ रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण मृत्यू पावत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडचे शासकीय रुग्णालय मराठवाड्यातील दुसरं मोठं रुग्णालय आहे. या रुग्णालयात नांदेड, परभणी, हिंगोली सह तेलंगणा राज्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात.

शेवटच्या क्षणी नातेवाईक रुग्णांना घेऊन येथे येत असतात. त्यांना वाववण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न असतात.

आज घडीला नवजात बालकांसह एकूण ६६ रुग्ण अत्यवस्थ आहेत. या रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती अधिष्ठाता वाकोडे यांनी दिली आहे.

दरम्यान नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दररोज सरासरी १६ रुग्ण दगावत असल्याची माहिती वाकोडे यांनी दिली आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here