कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : एएस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याला वाचवण्यासाठी एका बड्या नेत्याच्या मुलाने मदत केल्याचे मोबाइल संभाषण सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यात संबंधित मुलाने लोहितसिंगकडून ९५ लाख रुपये उकळल्याचीही चर्चा आहे.
याबाबत पोलिसांनी काय तपास केला? याची उत्सुकता वाढली आहे.
एएस ट्रेडर्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अटकेतील मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (दि. ३) संपली. कोठडीतील चौकशीदरम्यान त्याच्याकडून खंडणी उकळणाऱ्या खंडणी बहाद्दरांची नावे पोलिसांना मिळाली असून, काही मुद्देमाल जप्त करण्यातही पोलिसांना यश आले आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर लोहितसिंगचा ताबा लोणावळा पोलिसांकडे देण्यात आला.
गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एएस ट्रेडर्स कंपनीने मोठा गंडा घातला. या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्या अटकेनंतर फसवणुकीची नेमकी व्याप्ती स्पष्ट झाली.
त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे, तसेच काही मुद्देमालही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अन्य साथीदारांकडे असलेल्या रकमा, त्यांच्याकडील गुंतवणूकदारांची संख्या, एजंटना दिलेले कमिशन, खरेदी केलेल्या महागड्या वस्तू, खंडणीसाठी दबाव टाकणाऱ्या खंडणी बहाद्दरांचीही नावे पोलिसांना मिळाली आहेत.
यात राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.
लोणावळा पोलिसांच्या कोठडीत रवानगी
कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीतील मुदत संपल्याने लोणावळा पोलिसांनी लोहितसिंगचा ताबा घेतला. त्याच्या विरोधात लोणावळ्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तिथेही काही गुंतवणूकदारांना त्याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.