कोल्हापूर : माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे? असा सवाल उपस्थित करत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी कोल्हापुरात मंगळवारी (दि.१७) रात्री केशवराव भोसले नाट्यगृहात आपली शब्दसुरांची भावयात्रा रंगवली.
राक्षसांशी राक्षसांची सर्व युद्धे संपली दंगली करतात आता माणसांशी माणसे अशी वेदना मांडत त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.
येथील प्रयोदी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पांचाळे यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. औपचारिक कार्यक्रमानंतर दोन तासाहून अधिक वेळ पांचाळे यांनी आपल्या सुरमयी गझलांनी रसिकांना डोलवले. डॉ. प्रवीण कोडोलीकर आणि योगिता कोडोलीकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो माेगरा असावा’ असे सांगतानाच
‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे’ असा अस्वस्थ करणारा प्रश्नही पांचाळे यांनी उपस्थित केला.
‘हे का कुणी फुलांना सांगायला हवे,
त्यांनी कसे ऋतुंशी वागायला हवे’ अशा वास्तवाची जाणीव करून देतानाच पांचाळे यांनी
‘हारण्यास एक नवा डाव पाहिजे
साकळे जुना नवीन घाव पाहिजे’ अशी संघर्षाची वृत्तीही आपल्या गझल गायनातून स्पष्ट केली. ‘जीवनाला दान’,’ आसवांचे जरी हासे’,’मज नको हे गगन’,’तू नभातले तारे’,’रोशनीचे कायदे’ या गझला सादर केल्या.
‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय अन् काळी काय
महागाईन पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय…
रक्त लालच आहे सर्वांचे कशास मग ही भेदभावना
सगळ्यांना मातीत जाणे कुणबी काय, माळी काय’
असे विषण्ण वास्तव मांडल्याने नाट्यगृहातील रसिकही गंभीर झाले. तत्पूर्वी झालेल्या औपचारिका कार्यक्रमात ५१ वर्षे गझल सेवा करणाऱ्या पांचाळे यांचा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सरोज बिडकर उपस्थित होत्या.