जुने वीज मीटर काढून नवीन मीटर बसविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या संतोष भागवत प्रजापती (३२, रा. आदर्श नगर, कक्ष, जळगाव) या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
शहरातील एका भागात राहणाऱ्या तक्रारदाराच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे वीज मिटर आहे. हे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगितले.
याविषयी तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पथकाने सापळा रचून वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती याला २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव, अमोल वलसाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ रवींद्र घुगे, शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, पोकॉ प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांनी कारवाई केली.