कोल्हापूर : येथील दसरा चौक ते कसबा बावडा रोडवर महावीर कॉलेजसमोर ‘भारत सरकार, जीएसटी’ असा फलक असलेल्या भरधाव अलिशान कारने बुधवारी एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वरूण रवी कोरडे (वय २२, रा.
उदयसिंगनगर, महावीर कॉलेजजवळ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. अपघात चौघे जखमी झाले.
भरधाव कारने दोन कारसह सात दुचाकींनाही जोरात धडक दिली. त्यानंतर कार दोन ते तीनवेळा उलटली. रात्री साडेदहा वाजता हा अपघात घडला. दरम्यान, अपघात पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, एमएच १० ईए ९४९५ या नंबरची आणि भारत सरकार, जीएसटी विभाग असे लिहिलेली कार बावड्याकडून भरधाव वेगाने शहराच्या दिशेने येत होती.
प्रचंड वेगात असलेल्या कारने पहिल्यांदा महावीर कॉलेजसमोर बॅडमिंटन खेळून घरी जाणारा वरून काेरडे या दुचाकीस्वाराला उडवून सुमारे दहा फूट फरफटत नेले. महावीर कॉलेजच्या बाजूकडील फुटपाथलगत लावलेल्या दुचाकींना धडकत समोरून येणाऱ्या कारला जोरात त्याने धडक दिली. त्यानंतर त्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारलाही उडवले. यामध्ये एकूण तीन कारचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, धडक बसल्यानंतर जोरात आवाज आला. त्यावेळी आजूबाजूसह बघ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धडक दिलेल्या कारच्या चालकास चांगलाच चोप दिला. जमावाकडून त्याला पोलिसांनी सोडवून घेत ताब्यात घेतले.
रक्ताचा सडा, मृतदेह छिन्नविछीन्न
सुसाटपणे चिरडल्याने वरूनच्या मृतदेह छिन्नविछीन्न झाला होता. दुचाकीचा चुरा झाला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. शव सीपीआरमध्ये नेल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याने रक्त धुवून काढले.
चालक मदधुंद असल्याची शक्यता
धडक दिलेल्या कारचा चालक मदधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये बाटल्या आणि चकना मिळाला. धडकलेल्या कारमधील एअरबॅग उघडल्याने चालक बचावला.
कसबा बावड्यातही धडक
त्या कार चालकाने कसबा बावड्यातील काही दुचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात आले. यावरून तो तेथूनच सुसाटपणे आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
जोतिबा दर्शनाहून घरी जातानाच..
संजय गावडे हे मुलग्यासह कुटुंबातील चारजण जोतिबा दर्शनास गेले होते. दर्शन घेवून परतत असताना महावीर कॉलेजसमोर भरधाव कारने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. कारमधील गावडे यांचा मुलगा जखमी झाला. सुदैवाने कारमधील इतर कोणास फारशी दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
वाहतूक ठप्प
अपघातामुळे बघ्यांची गर्दी आणि धडक दिलेली कार रस्त्यात असल्याने रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवताना आणि गर्दीतून घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांची तारांबळ उडाली होती.