नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईलचे दुकान फोडल्याच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोन अल्पवयीन चोरट्यांच्या मदतीने त्याने दुकान फोडले.
नरेश प्राणनाथ घई (५२, पार्क व्हू अपार्टमेंट, कस्तुरचंद पार्क) असे दुकानदाराचे नाव असून, त्यांचे टेलिफोन एक्स्चेंज चौक येथे काव्या मोबाइल शॉपी हे दुकान आहे. शनिवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले व सोमवारी दुकान उघडले.
या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातील विविध कंपन्यांचे २१ मोबाइल व तीन स्मार्ट वॉच असा एकूण २.३५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. घई यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकातर्फेदेखील याचा समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. त्यात मोहम्मद अर्शीद उर्फ अर्शद साजीद शेख (१९, मोठा ताजबाग, यासीन प्लॉट) हा दिसून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून पूर्ण माल जप्त करण्यात आला. आरोपींनी लकडगंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, समाधान बळबजकर, मधुकर काठोके, बलराम झाडोकर, सतिश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोष ठाकूर, जितेश रेड्डी, दिपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, दीपक लाखडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.