गहाळ दाखले बनविण्यासाठी पोलिसांचे बनावट शिक्के व दाखले करणाऱ्या दोघांना शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. महादेव अरुण राऊत (वय ३९, रा. मूळ बेल्लाटी, ता. उत्तर सोलापूर, सध्या गणेश पार्क, कदमवाडी) आणि अमर शरद फलके (२७, रा.
प्लॉट क्र. चार मणेर मळा, उचगाव) अशी त्याची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची महिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की संशयित आरोपींनी वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्रे गहाळ झाल्यावर द्यावयाचे पोलिसांचे दाखले आणि त्यावरील शिक्के बनावट तयार केले आहेत.
त्याचा वापर करून ते डुप्लिकेट परवाना आणि वाहनांची कागदपत्रे करून देत होते. तपासात हे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकारात माहिती घेऊन तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तिघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी केवळ दोघांनाच अटक झाली आहे. त्यांना मिळालेल्या पाच दिवसांच्या कोठडीत त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाणार आहे.
त्यांनी बनावट शिक्के कोठे केले यापासून इतर माहिती तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच तिसरा संशयित शौकत शेख याचा नेमका पत्ता पुढे न आल्यामुळे त्याला अटक करता आली नाही. त्याचाही शोध सुरू आहे.
या तपासातून नेमके कशा पद्धतीने गहाळ दाखले बनविले जात होते. पोलिसांचेही बनावट शिक्के कोठे केले याचीही माहिती पुढे येणार आहे. यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एजंटांचे कारनामे पुढे येत आहेत.